
रायगड, 28 जुलै (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील थळ डोंगरी येथे बंद घर फोडून ₹५० हजारांची रोकड आणि सोन्याची अंगठी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ठाणे येथील श्रीजी कृपा, स्वामी नारायणनगर येथील रहिवासी असून त्यांचे थळ डोंगरी येथे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटाचा दरवाजा तोडून कपाटातील कपडे अस्ताव्यस्त फेकण्यात आले. कपाटातील तिजोरी उघडून त्यामधील ₹५० हजारांची रोकड आणि सोन्याची अंगठी असा ऐवज चोरून नेण्यात आला. चोरीनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) व ३२४(४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घरफोडीचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हंबीर करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)