अमरावती : प्रा. गजानन भारसाकळे यांच्या संशोधनाला भारत सरकारकडून ‘रजिस्टर डिझाइन’ची मंजुरी
गाईच्या शेणापासून गोवरी निर्मिती मशीनच्या डिझाइनला मान्यता अमरावती, 28 जुलै (हिं.स.) | दर्यापूर तालुक्यातील माहुली धांडे येथील गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. गजानन रामकृष्ण भारसाकळे यांच्या ‘गाईच्या शेणापासून गोवरी उत्पादनासाठी आयओटी-आध
गाईच्या शेणापासून गोवरी निर्मिती मशीनच्या डिझाइनला पेटंट


गाईच्या शेणापासून गोवरी निर्मिती मशीनच्या डिझाइनला मान्यता

अमरावती, 28 जुलै (हिं.स.) | दर्यापूर तालुक्यातील माहुली धांडे येथील गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. गजानन रामकृष्ण भारसाकळे यांच्या ‘गाईच्या शेणापासून गोवरी उत्पादनासाठी आयओटी-आधारित मशीन’ या अभिनव संशोधनाला भारत सरकारच्या डिझाइन्स अधिनियम, २००० अंतर्गत नोंदणीकृत औद्योगिक रचना (रजिस्टर डिझाइन) मंजूर झाली आहे. ग्रामीण विकास, गोसेवा आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या संशोधनाची राष्ट्रीय स्तरावर अधिकृत दखल घेण्यात आली आहे.

यापूर्वीही प्रा. भारसाकळे यांना गाईच्या शेणापासून रांगोळी व खडू निर्मिती या ‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेवरील संशोधनासाठी भारत सरकारकडून तीन कॉपीराइट्स प्राप्त झाले आहेत. तीन कॉपीराइट्स आणि डिझाइन पेटंट, अशी दुहेरी मान्यता मिळाल्याने त्यांच्या संशोधनाची विशेष दखल घेतली जात आहे. या आयओटी-आधारित मशीनच्या निर्मितीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हॅकेथॉन स्पर्धेतील पुरस्कारातून स्थापन झालेल्या डंक्स अँड हर्ब्स प्रा. लि. या स्टार्टअपच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. भारसाकळे यांनी दिली. उन्नत भारत अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचे मार्गदर्शनही या प्रकल्पाला लाभणार आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. भारसाकळे यांना यापूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे समाजकार्य व पर्यावरण क्षेत्रातील प्रतिष्ठेचे पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande