
बीड, 28 जुलै (हिं.स.)। भारतीय संस्कृतीमध्ये गुरू व गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच या दिवशी गुरु व शिष्याचे नाते अजून घट्ट होण्यासाठी गुरुपौर्णिमा ही अतिशय मनोभावे साजरी केली जाते. बुधवार दि २९ रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अंबाजोगाई शहरालगत असलेल्या चनई येथील श्री गुरु पादुका मठात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मठाचे मठाधीश परमपूज्य सर्वज्ञेश्वर स्वामी महाराज यांनी दिली आहे.
गुरुपौर्णिमेच्या दिवसाची सुरुवात मठामध्ये सकाळी ७ वाजता सर्वप्रथम भगवान केदारनाथ महाराजांच्या अभिषेकाने होईल. त्यानंतर सकाळी ८ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांचा षोडशोपचार अभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत भक्तांकडून श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा सामूहिक जप व भजन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. गुरुपौर्णिमेच्या सायंकाळी ६ वाजता महाआरतीनंतर मठातून स्वामी समर्थांचा पालखी सोहळा निघणार असल्याचे मठाधिपती यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे. या पवित्र सेवांचा जास्तीत जास्त भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मठाधिश सर्वज्ञेश्वर स्वामी महाराज यांच्यासह सिद्धिविनायक वसाहती मधील सर्व रहिवासी व समस्त स्वामीभक्त परिवाराने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis