
जळगाव, 31 जुलै (हिं.स.)भुसावळ स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने (RPF)‘ऑपरेशन नार्कोस’अंतर्गत धडक कारवाई करत ३ लाख ९८ हजार ९०० रुपये किमतीचा तब्बल ७ किलो ९७८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी बाबू विजय गौडा (वय २३, रा. गंजम, ओडिसा) या परप्रांतीय संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. उधना–अमृत भारत एक्स्प्रेसच्या जनरल डब्यामध्ये सीआयबी पथकाचे उपनिरीक्षक सुनील कोली गस्तीवर असताना त्यांना एका युवकाच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. आरोपीने गांजा असलेली बॅग ट्रेनच्या बाथरूममध्ये लपवून ठेवली होती. ट्रेन भुसावळ स्थानकावर पोहोचताच आरपीएफ पथकाने तातडीने संशयिताला ताब्यात घेतले. संशयित बॅगेची तपासणी करण्यासाठी आरपीएफच्या डॉग स्क्वॉडला बोलावण्यात आले होते. डॉग ‘वीरू’ने बॅगेला हुंगून त्यात अमली पदार्थ असल्याची पक्की खात्री दिली. त्यानंतर राजपत्रित अधिकारी अभय कुमार शर्मा यांच्या उपस्थितीत रीतसर पंचनामा करण्यात आला. बॅगेची तपासणी केली असता त्यात ७ किलो ९७८ ग्रॅम गांजा आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या गांजासह आरोपी बाबू विजय गौडा याला पुढील कायदेशीर कारवाई आणि सखोल तपासासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या (GRP) ताब्यात देण्यात आले आहे. आरपीएफच्या या सतर्कतेमुळे रेल्वेतून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीत मोठा खुलासा झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर