चिपळुणात भरदिवसा घरफोडी; ८.१८ लाखांचा ऐवज लंपास
रत्नागिरी, 31 जुलै (हिं.स.) । चिपळूणमधील गोवळकोट रोड परिसरातील अल नजु अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे ८ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. ३० जुलै) घडली. या प्रकरणी चिपळ
चिपळुणात भरदिवसा घरफोडी; ८.१८ लाखांचा ऐवज लंपास


रत्नागिरी, 31 जुलै (हिं.स.) । चिपळूणमधील गोवळकोट रोड परिसरातील अल नजु अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे ८ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. ३० जुलै) घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवळकोट रोड येथील अल नजु अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नगमा अबीदअली मुजावर (वय ४०) या ३० जुलै रोजी दुपारी १२.३० ते १.४० या कालावधीत घराबाहेर गेल्या होत्या. याचवेळी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

चोरीस गेलेल्या ऐवजात विविध सोन्याची मंगळसूत्रे, चेन, नेकलेस, कर्णफुले, अंगठ्या तसेच ८ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ८ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याच कालावधीत चिपळूण बायपास रोडवरील द्वारका कृष्णकुंज इमारतीतील धनश्री भोसले यांच्या घरातही चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये एकाच टोळीचा सहभाग आहे का, या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande