
अमरावती, ८ जुलै (हिं.स.)।अमरावती शहर गुन्हे शाखेने शहरातील सुरू असलेल्या ऑनलाइन चक्री जुगाराविरोधात कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १४ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार शहरातील अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला यशोदा नगर क्रमांक १, गल्ली क्रमांक २ येथील पातालवंशी डेली नीड्स दुकानात ऑनलाइन चक्री जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यावेळी संगणकाच्या माध्यमातून ‘फन टार्गेट’ आणि ‘गोल्डन चान्स’ या वेबसाइटवर ऑनलाइन चक्री जुगार खेळला जात असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून दोन जणांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची नावे सुरज उर्फ भुऱ्या बबन ढोके (वय १९, रा. यशोदा नगर) आणि निलेश किसन थोरात (वय २१, रा. चवरे नगर) अशी असल्याचे समोर आले.
आरोपींकडून रोख रक्कम तसेच ऑनलाइन जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १४ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी फेजरपुरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, श्याम घुगे, प्रांजली सोनवणे आणि सहायक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर आणि दिनेश दाहातोंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी