
नाशिक, 08 जुलै (हिं.स.)। शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले असून रामसेतूलाही पाणी लागले आहे. त्यामुळे नदीकाठावरील परिसरात पूरस्थितीचे चित्र निर्माण झाले असून नागरिक मोठ्या संख्येने पूर पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
या पुराचे वैशिष्ट्य म्हणजे गंगापूर धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. धरणाचे दरवाजे बंद असतानाही गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार आणि जोरदार पावसामुळे नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. परिणामी, गोदावरीची पाणीपातळी वेगाने वाढून नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
पूराच्या पाण्यामुळे रामकुंड परिसरातील अनेक घाट पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या परिसरावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात उतरणे टाळावे, तसेच पूरग्रस्त भागात विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV