
लातूर, 08 जुलै (हिं.स.)लातूर जिल्ह्यात 'ऑपरेशन शोध' मोहिमेद्वारे झालेल्या आणि बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुली व महिलांचा शोध घेण्यावर पोलीस प्रशासनाने विशेष भर दिला आहे. याच मोहिमेअंतर्गत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेने (AHTU) अत्यंत प्रभावी तपास करत, अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध लावून तिला सुखरूप तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे.
औसा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद होता. यातील अल्पवयीन मुलीस आरोपी सचिन मल्लिनाथ वारिक, रा. आळंद (जि. कलबुर्गी, कर्नाटक) याने फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणाचा तपास करताना AHTU पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील यांनी सायबर सेलच्या तांत्रिक मदतीने आरोपीचे आणि अल्पवयीन मुलीचे नेमके लोकेशन शोधून काढले. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आणि अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीयु कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील, महिला पोलीस अंमलदार सुदामती वंगे, पोलीस अंमलदार सदानंद योगी आणि सचिन मुंडे यांच्या पथकाने पार पाडली. अपहरण व बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तत्परतेने कार्यरत असून, अशा प्रत्येक प्रकरणाचा प्रभावी तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis