अमेरिकेने इराणवर पुन्हा सुरु केले हल्ले
वॉशिंग्टन , 08 जुलै (हिं.स.)।पश्चिम आशियामध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणविरुद्ध लष्करी कारवाया सुरू केल्या आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन व्यापारी जहाजांवर इराणने हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेने ही कारवाई
होर्मुझ सामुद्रधुनीतील हल्ल्यानंतर अमेरिकेची इराणवर लष्करी कारवाई सुरु


वॉशिंग्टन , 08 जुलै (हिं.स.)।पश्चिम आशियामध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणविरुद्ध लष्करी कारवाया सुरू केल्या आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन व्यापारी जहाजांवर इराणने हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेने ही कारवाई केली आहे. दुसरीकडे, इराणच्या सरकारी माध्यमांनी देशाच्या दक्षिणेकडील भागांमध्ये अनेक स्फोट झाल्याची माहिती दिली आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सामाजिक माध्यमांवर जाहीर केले की, त्यांच्या सैन्याने इराणवर व्यापक हल्ले सुरू केले आहेत. अमेरिकेने सांगितले की, हे हल्ले होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन जहाजांवर झालेल्या कथित इराणी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून करण्यात आले आहेत. अमेरिकेने इराणच्या या आक्रमक भूमिकेला अनुचित, धोकादायक आणि युद्धविरामाचे स्पष्ट उल्लंघन असे संबोधले आहे. अमेरिकेच्या घोषणेनंतर लगेचच इराणी सरकारी माध्यमांनी दक्षिण इराणमध्ये सलग स्फोट झाल्याचे वृत्त दिले.

माध्यमांच्या माहितीनुसार, दक्षिणेकडील सिरिक शहरात सात स्फोटांचे आवाज ऐकू आले. तसेच सिरिकमधील ताहेरुई पियर परिसरात सहा क्षेपणास्त्रे किंवा तोफगोळे पडल्याचे सांगण्यात आले. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटांमुळे झालेल्या नुकसानीबाबत किंवा कोणत्याही जीवितहानीबाबत तात्काळ माहिती उपलब्ध झालेली नाही. याशिवाय दक्षिण इराणमधील केश्म बेट आणि बंदर अब्बास येथेही स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, या हल्ल्यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सामाजिक माध्यमांवर एक संदेश प्रसिद्ध करत म्हटले आहे की, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्रालय अमेरिकेकडून कराराचे उल्लंघन केल्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांबाबत इशारा देत आहे. इराण आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचे आणि सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते कोणतेही पाऊल उचलेल.”

ब्रिटिश सैन्याच्या माहितीनुसार, मंगळवारी होर्मुझ सामुद्रधुनीत तीन तेलवाहू टँकरांवर हल्ले झाले होते. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या माहितीनुसार, एप्रिलच्या अखेरीपासून एका दिवसात जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमधील ही सर्वात मोठी घटना आहे. या हल्ल्यांमुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि सागरी वाहतूक पूर्ववत करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.ब्रिटिश सागरी एजन्सीच्या माहितीनुसार, ओमानच्या किनाऱ्याजवळ एका द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) वाहून नेणाऱ्या टँकरवर हल्ला झाला, ज्यामुळे त्याला आग लागली. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने दावा केला की, इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यानंतर या टँकरवर हल्ला करण्यात आला. मात्र, या हल्ल्याची थेट जबाबदारी इराणने स्वीकारलेली नाही. याशिवाय इतर दोन जहाजांचेही नुकसान झाले, परंतु त्यांनी आपला प्रवास पुढे सुरू ठेवला असून कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

या हल्ल्यांनंतर काही तासांतच अमेरिकेने इराणला तेल निर्बंधांमधून दिलेली ६० दिवसांची सूट रद्द केली. हा परवाना अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने गेल्या महिन्यात जारी केला होता आणि तो २१ ऑगस्टपर्यंत वैध होता. अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, इराणची ही कृती अस्वीकार्य असून त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा सध्या ठप्प असतानाच हा तणाव वाढला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली ठेवणे, इराणचा अणुकार्यक्रम रोखणे आणि २८ फेब्रुवारीपासून सुरू असलेला संघर्ष संपवणे, हे या चर्चेचे प्रमुख उद्दिष्ट होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande