
नांदेड, 14 ऑगस्ट (हिं.स.)। कुंडलवाडी येथील एका भांड्यांचे गोडाऊन फोडून तांबा-पितळाची भांडी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा नांदेड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून चोरीला गेलेला १०० टक्के मुद्देमाल (किंमत ४७,००० रुपये) जप्त केला आहे.
अज्ञात चोरट्यांनी कुंडलवाडी येथील एका भांड्यांच्या गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि तेथील तांबा-पितळाची भांडी चोरून नेली होती. याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ९३/२०२६, कलम ३३१(३), ३०५ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी तातडीने पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. कुंडलवाडी पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तेलंगणा राज्यातील निझामाबाद परिसरातून चार आरोपींना ताब्यात घेतले.
----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis