आगामी 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य - राष्ट्रपती
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे संबोधन नवी दिल्ली, 14 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्य
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संग्रहित फोटो


स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे संबोधन

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. आगामी 2047 पर्यंत भारताला ‘विकसित भारत’ बनविण्याच्या संकल्पावर त्यांनी विशेष भर दिला. देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असून, राष्ट्रनिर्मितीत प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

न्यायव्यवस्थेचा उल्लेख करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, आर्थिक किंवा इतर संसाधनांच्या अभावामुळे कोणताही नागरिक न्यायापासून वंचित राहू नये, ही न्यायव्यवस्थेशी संबंधित प्रत्येकाची जबाबदारी आहे. सामाजिक समानता, संधीची समानता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा ही संविधानाची प्रमुख मूल्ये असल्याचे सांगत त्यांनी वंचित घटकांना वेळेवर आणि सन्मानपूर्वक न्याय मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

दहशतवादावर पाकिस्तानला स्पष्ट संदेश

दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला स्पष्ट संदेश देताना राष्ट्रपतींनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख केला. भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवादी नेटवर्कविरोधात अचूक आणि प्रभावी कारवाई करण्याची क्षमता सिद्ध केली असल्याचे त्यांनी सांगितले.

दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशासोबत सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने निर्णायक पाऊल असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. या निर्णयाचे देशातील शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्व असल्याचेही त्यांनी नमूद केले.

युवा शक्ती ही देशाची मोठी ताकद

राष्ट्रपती मुर्मू यांनी युवाशक्तीला देशाची मोठी ताकद असल्याचे सांगितले. सार्वजनिक परीक्षांमध्ये सुधारणा, गैरप्रकारांना आळा आणि युवकांसाठी पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकारकडून व्यापक उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे 28 वर्षे सरासरी वय असलेल्या युवा टीमच्या नेतृत्वाखाली नुकतेच यशस्वी अंतराळ रॉकेट प्रक्षेपण करण्यात आल्याचा उल्लेख करताना त्यांनी भारतीय तरुणांची क्षमता, कौशल्य आणि आत्मविश्वास अधोरेखित केला.

एकूण ७८ जवानांना शौर्य पुरस्कार मंजूर

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संरक्षण दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांसाठी 78 शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. यामध्ये 13 मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश आहे.या पुरस्कारांमध्ये 9 कीर्ती चक्र, त्यापैकी 7 मरणोत्तर; 1 शौर्य चक्र ‘बार’; 19 शौर्य चक्र, त्यापैकी एक मरणोत्तर; 5 सेना पदक (शौर्य) ‘बार’; 36 सेना पदक (शौर्य), त्यापैकी 5 मरणोत्तर; 3 नौसेना पदक (शौर्य) आणि 5 वायुसेना पदक (शौर्य) यांचा समावेश आहे.

स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण

राष्ट्रपतींनी आपल्या संबोधनात ‘वयं राष्ट्रे जागृयाम’ या वेदवाक्याचा उल्लेख केला. देशाप्रती सदैव जागरूक आणि सजग राहण्याची प्रेरणा या वाक्यातून मिळते, असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करताना त्यांनी सांगितले की, त्यांचे एकच ध्येय होते—भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे. स्वदेशी आंदोलनाच्या काळात ‘वंदे मातरम्’ हे जनतेच्या मनातील गीत बनले, याचाही त्यांनी उल्लेख केला. महात्मा गांधींशी संबंधित स्वातंत्र्यसैनिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक सुधारणांतील योगदानाचेही राष्ट्रपतींनी स्मरण केले.

फाळणीच्या वेदनादायी आठवणींना उजाळा

दरवर्षी 14 ऑगस्ट रोजी पाळल्या जाणाऱ्या विभाजन विभीषिका स्मृती दिनाचा उल्लेख करताना राष्ट्रपतींनी फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या आणि घरदार सोडण्यास भाग पाडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली.सांप्रदायिक हिंसाचारामुळे लाखो लोकांना निर्वासित व्हावे लागले. मात्र एवढ्या मोठ्या यातना सहन करूनही त्यांनी आपली भारतीय ओळख सोडली नाही, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

सरदार पटेलांच्या योगदानाचे स्मरण

स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत 550 हून अधिक संस्थानांमध्ये विभागलेला होता. या संस्थानांना एकत्र आणणे हे मोठे आव्हान होते. संस्थानांच्या विलीनीकरणात सरदार वल्लभभाई पटेल यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे स्मरण करत राष्ट्रपतींनी त्यांना अभिवादन केले.

आज भारत संविधानाच्या आधारावर पुढे जात असून, नागरिकांचा सक्रिय सहभाग ही देशाची मोठी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक व्यक्ती मोठी स्वप्ने पाहू शकतो आणि ती पूर्ण करण्याची क्षमता त्याच्यात आहे, हा विश्वास आज अधिक दृढ होत असल्याचेही राष्ट्रपतींनी नमूद केले.

फुले दाम्पत्याच्या कार्याचा गौरव

राष्ट्रपती मुर्मू यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या दोनशेव्या जयंतीचा उल्लेख करताना महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक न्याय, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि समानतेसाठीच्या कार्याचे स्मरण केले.फुले दाम्पत्याच्या विचारांनुसार गेल्या काही वर्षांत वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना पुढे जाण्याच्या संधी उपलब्ध करून देणे हे राष्ट्रीय प्राधान्यक्रमांमध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

विकसित भारतासाठी जनभागीदारीचे आवाहन

राष्ट्रपतींच्या संबोधनात विकसित भारताचे लक्ष्य, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक न्याय, युवा शक्ती, संविधानाची मूल्ये आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग हे प्रमुख मुद्दे ठरले. २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande