
गुवाहाटी, 15 ऑगस्ट (हिं.स.)। आसाममध्ये पूरस्थितीत वेगाने सुधारणा होत आहे. सर्व नद्या धोक्याच्या पातळीखाली वाहत आहेत. बाधित लोक मदत छावण्यांमधून आपल्या घरांकडे परतू लागले आहेत. सरकार बाधितांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. विशेषतः रस्ते व मार्गांची दुरुस्ती तसेच चिखल हटविण्याचे कामही वेगाने सुरू आहे. शाळांची स्वच्छता व दुरुस्तीचे कामही वेगाने केले जात आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या 14 ऑगस्टच्या आकडेवारीनुसार, सर्व नद्या धोक्याच्या पातळीखाली वाहत आहेत. मात्र, शिवसागर जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा एक मृतदेह सापडला असून, त्यामुळे पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 105 वर पोहोचली आहे. बाधित जिल्ह्यांमध्ये नगाव, गोलाघाट, शिवसागर, कामरूप, होजाई, जोरहाट आणि लखीमपूर यांचा समावेश आहे. या 7 जिल्ह्यांतील 20 महसूल मंडळांमधील एकूण 313 गावे बाधित झाली आहेत. सध्या राज्यातील एकूण 78,637 नागरिक अद्याप बाधित आहेत आणि 8,268.71 हेक्टर कृषी जमीन पाण्याखाली गेली आहे.
मदत व बचाव अभियानात एसडीआरएफ, डीडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल आदी यंत्रणा कार्यरत आहेत. दरम्यान, पूरग्रस्त भागांमध्ये शुक्रवारी राज्य सरकारने एकूण 44 वैद्यकीय पथके तैनात केली. यावेळी पाच बोटीही मदतकार्यात सहभागी होत्या. बोटींच्या माध्यमातून पूरग्रस्त 117 लोकांना वाचवून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले आहे.
पुरामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी सरकार सातत्याने आढावा बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेत आहे. मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्व सरमा आणि राज्य सरकारमधील अनेक मंत्री अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेऊन बाधितांच्या मदतीसाठी सर्वतोपरी पावले उचलत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule