
मुंबई, 15 ऑगस्ट (हिं.स.) - या शतकातील 25 वर्षे सरली आहे. आता येणारी 25 वर्षे आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. आता आपण थांबू शकत नाही, आपली दिशा ठरली आहे. आपली गती थांबू शकत नाही. आपल्याला ठरलेले ध्येय प्राप्त करायचे आहे, त्यासाठी आपल्याला आपले वर्क कल्चर बदलावे लागेल. आपले विचार बदलावे लागतील. आपल्या कामाची गती बदलली पाहिजे. जे काम गेल्या पाच-सात दशकांमध्ये झाले नाही, ते आपल्याला पुढील पाच-सात वर्षांत करायचे आहे. मला देशातील युवाशक्तीवर विश्वास आहे. आपल्या सर्वच क्षेत्रांत सुधारणांची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी शनिवारी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केले.
मोदी पुढे म्हणाले की, सध्या ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे आपल्या चीप, एआय, डेटा सेंटर असो यासाठी आपल्या वीजेची मोठी गरज आहे. ऊर्जा सुरक्षा ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपण महत्त्वाची पावले टाकली आहे. अणुउर्जा हा उर्जेचा मोठा स्रोत आहे. 2047 पर्यंत 100 गिगावॅट उर्जानिर्मितीचे लक्ष्य आपण ठेवले आहे. पुढील दशकात पाच नवीन न्युक्लिअर रिअॅक्टर सुरु करण्याचे लक्ष्य आहे. यावर्षी भारताने फास्ट ब्रीडर न्युक्लिअर तंत्रज्ञानात महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे अणुउर्जेत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आपण महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. डिजिटल क्रांती आणि नवसंशोधनाच्या जोरावर भारताने जागतिक पटलावर आपला दबदबा निर्माण केला असून, आगामी काळात 'मेड इन इंडिया ६जी' आणि सेमीकंडक्टर निर्मितीच्या जोरावर भारत या क्षेत्राचे नेतृत्व करेल, असा नवा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या 10-12 वर्षात देशाने अनेक संकटांचा सामना केला. कोरोनाने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले होते. कोरोनातून बाहेर निघाल्यावर युद्धामुळे तणाव निर्माण झाला. त्यावेळी अनेक भविष्यवेत्त्यांनी काय-काय म्हटले होते, देशाला घाबरवणे, चिंतेत ठेवणे, यातच काहीजणांना आनंद मिळतो. कोरोना लस मिळणार नाही, कोविडमध्ये लोक वाचणार नाहीत, आखाती युद्धामुळे पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, खते मिळणार नाहीत, अशा अफवा पसरवण्यात आल्या. मात्र, देशाने पाहिले की, गेल्या 12 वर्षातील योजनांचा फायदा आता होत आहे. इतक्या मोठ्या संकटानंतरही भारताने केलेली तयारी आणि निर्णयांमुळे फायदा झाला. आज देशात पेट्रोल, गॅस, युरिआ सगळे काही आहे. आपण आपल्या ताकदीवर चालत आहोत. या संकटांचा प्रभाव सगळ्यांवर झाला. जगात युरियाची एक गोणी 3000 रुपयांना मिळते. पण आपल्या देशातील शेतकऱ्यांना तीच गोणी फक्त 300 रुपयांत मिळते.
वेगवेगळ्या प्रवेश पूर्व परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी खासगी कोंचिग क्लासेसचे शुल्क आर्थिक ओझे बनू लागले आहे. पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना या मुद्द्यावर भाष्य केले. खासगी कोचिंग क्लासेसचा आर्थिक भार हा चिंतेचा विषय बनला आहे. यातून गरीब आणि मध्यमवर्गीयांची सुटका करण्यासाठी सरकार मोफत कोचिंग क्लासेसची व्यवस्था निर्माण करणार असल्याची घोषणा मोदींनी केली. प्रत्येक आई वडिलाला वाटत आहे की, मुलाला कोचिंग क्लासला पाठवले नाही, तर आपण प्रतिष्ठित कुटुंब नाही आहोत. या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचा विचार सरकार करत आहे. त्यांचा हजारो रुपयांचा खर्चही वाचला पाहिजे. मुलंही आपल्या आजूबाजूला राहावेत आणि त्यांची काळजी घेता यावी आणि कुटुंबावरही आर्थिक ताण येऊ नये. त्यामुळे आम्ही युवकांसाठी वेगवेगळ्या परीक्षांची मोफत ऑनलाइन कोचिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणाही मोदी यांनी केली. डिजिटल सार्वजनिक सोयीसुविधा आहेत. आपल्याकडे सर्वोत्कृष्ट गुणवत्ता असलेले शिक्षक आहेत. या सगळ्यांना एकत्र आणून आम्ही देशातील युवकांना मोफत कोचिंग देण्यासाठी देशभरात नेटवर्क निर्माण करणार आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत असल्याचा मुद्दाही मांडला. पंतप्रधान म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात भारताची ताकद वाढू लागली आहे. केंद्र सरकार येणाऱ्या एका वर्षात देशातील १ कोटी तरुणांना एआय कौशल्य विकास प्रशिक्षण देईल. येणाऱ्या काळात भारतात अनेक डेटा सेंटर तयार होणार आहेत. त्या माध्यमातून देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. विशाखापट्टणममध्ये गुगल डेटा सेंटर उभारत आहे. तर मेटा आणि रिलायन्स एकत्रित येऊन गुजरातमध्ये एक डेटा सेंटर बनवणार आहे. याचप्रमाणे इतरही कंपन्या भारतात स्वतःचे डेटा सेंटर उभारण्याची संधी शोधत आहे, असे मोदी म्हणाले.
मी आत्मनिर्भर भारताविषयी बोलायचो तेव्हा काही लोक एअर कंडिशन केबिनमध्ये बसून जागतिकीकरणाबद्दल बोलायचे. पण गेल्या दशकभरात जागतिकीकरण ही संकल्पना लोप पावत चालली आहे. प्रत्येक देश आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या पातळीवर शोधत आहे. पण या संकटाच्या काळात काही लोकांनी स्रोतांचा शस्त्रासारखा वापर केला. संपूर्ण जग पेट्रोल, डिझेल, औषधे, खते, चीप्स अशा गोष्टींचा शस्त्रासारखा वापर करत आहे. अशा काळात आपण आत्ननिर्भर होण्याच्या धोरणामुळे टिकून आहोत. आज भारत हा जगासाठी स्वीकृत आणि सन्माननीय देश आहे. भारतामध्ये स्थिर सरकार, मजबूत न्यायव्यवस्था आणि संविधान आहे. जगाला भारताच्या या सामर्थ्याचा परिचय झाला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
जे व्यापारी करार झाले आहेत, ती खूप मोठी संधी आहे. मी लघू-मध्यम उद्योगांना आव्हान करतो, आपल्याला ही संधी सोडायची नाही. भारताची उत्पादने जगाच्या बाजारपेठेत पोहोचवायची आहेत. त्यासाठी वैश्विक निकष आहेत, त्याचे पालन केले पाहिजे. जगातील इतर देशांच्या तुलनेत आपल्या दर्जेदार आणि स्वस्त उत्पादने द्यावी लागतील, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
--------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी