
स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्याहून केेले देशाला संबोधित
आत्मनिर्भरता, ऊर्जा सुरक्षा, उत्पादन आणि राष्ट्रीय सुरक्षेवर भर
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट (हिं.स.) : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्याच्या तटाहून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित केला. आता देशाने छोटी स्वप्ने न पाहता मोठी उद्दिष्टे निश्चित करून ती पूर्ण करण्यासाठी विचारसरणी, कार्यसंस्कृती आणि कामाचा वेग यामध्ये व्यापक बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, “काळ आपला आहे, संकल्प आपला आहे.” आगामी 5 ते 7 वर्षे भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी गेल्या अनेक दशकांत जी कामे पूर्ण होऊ शकली नाहीत, ती आगामी काही वर्षांत वेगाने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन केले. देशातील युवा शक्ती, शेतकरी, कामगार आणि नारी शक्तीच्या क्षमतेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पंतप्रधानांनी सांगितले की, 2047 पर्यंत विकसित भारत बनविण्याचे स्वप्न हे 140 कोटी भारतीयांच्या सामर्थ्य, मेहनत आणि संकल्पाशी जोडलेले आहे. भारताने विकसित राष्ट्र बनण्याचे लक्ष्य निश्चित केल्यामुळे जगाच्या नजरेत भारताची प्रतिमा बदलत असून, भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोनही बदलत आहे.हे लक्ष्य पूर्ण होईपर्यंत देशाने थांबता कामा नये. त्यासाठी कार्यसंस्कृतीत बदल, जलद निर्णयप्रक्रिया आणि काळानुरूप धोरणांची निर्मिती आवश्यक असल्याचे मोदी यांनी सांगितले.
ऊर्जा सुरक्षा आणि अणुऊर्जेवर भर
पंतप्रधानांनी सेमीकंडक्टर, महत्त्वाची खनिजे आणि ऊर्जा सुरक्षेला भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा सेंटरच्या वाढत्या वापरासाठी मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता भासणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे लक्ष्य भारताने ठेवले असून, देशात पाच नवीन अणुभट्ट्या सुरू करण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
समुद्रातील तेल आणि इतर नैसर्गिक संसाधनांच्या शोधाला चालना देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या कामासाठी सरकारने 85 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधानांनी देशाच्या विविध भागांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केली. सरकार प्रभावित नागरिकांची वेदना समजून घेत असून, त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
आसाम, केरळ, उत्तराखंड आणि नागालँडसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संकटग्रस्त कुटुंबांसोबत संपूर्ण देश उभा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारत ही काळाची गरज
पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेला सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारताच्या सामर्थ्याचा आधार असल्याचे सांगितले. पेट्रोल, डिझेल, खत, औषधे आणि तंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या संसाधनांचा जागतिक पातळीवर दबाव निर्माण करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे आत्मनिर्भर भारताचा संकल्प देशाच्या सुरक्षा आणि विकासासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांत भारताने आपली क्षमता सिद्ध केली असून, आता आत्मनिर्भरतेला आणखी बळ देण्याची आवश्यकता असल्याचे मोदी यांनी सांगितले.भारताच्या कंपन्यांनी जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये स्थान मिळविण्याचे लक्ष्य ठेवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. बँकिंग, औषधनिर्मिती, अकाउंटिंग आणि इतर क्षेत्रांमध्ये भारतीय कंपन्यांनी जागतिक स्तरावर विस्तार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
भारताने जगाला आकर्षित करणारे जागतिक दर्जाचे ब्रँड निर्माण केले पाहिजेत. राज्य सरकारे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी विकासाची गती वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
नक्षलवादाविरोधातील कारवाईचा उल्लेख
माओवाद आणि नक्षलवादामुळे देशातील अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 2014 नंतर सरकारने नक्षलवाद संपविण्याचा संकल्प केला असून, या दिशेने महत्त्वपूर्ण यश मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला.
ज्या भागांमध्ये पूर्वी नक्षलवाद्यांच्या गोळ्या झडत होत्या आणि हिंसाचाराचे वातावरण होते, तेथे आता विकास आणि विश्वासाचे वातावरण निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर तथाकथित “दिमागी नक्षलवाद” ओळखून त्यापासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ देशाच्या सीमांपुरती मर्यादित नसल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. तेल शुद्धीकरण प्रकल्प, बँकिंग व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांची सुरक्षा देखील तितकीच आवश्यक आहे. सुरक्षित भारताची निर्मिती करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
‘शक्तीची सप्तधारा’ आणि उत्पादनाला चालना
पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून “शक्तीची सप्तधारा” पुढे नेण्याचे आवाहन केले आणि देशाची उत्पादन व विनिर्माण क्षमता वाढविण्यावर विशेष भर दिला.
भारताने केवळ मोठ्या उत्पादनांवरच नव्हे, तर त्यांच्या छोट्या-छोट्या सुट्या भागांचेही देशात उत्पादन केले पाहिजे. डिझाइनपासून उत्पादनापर्यंत संपूर्ण मूल्यसाखळीत भारताची मजबूत भूमिका असावी आणि भारताला जागतिक पुरवठा साखळीचे प्रमुख केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे त्यांनी सांगितले.
भारतीय उत्पादनांची गुणवत्ता हीच भारताची जागतिक ओळख बनली पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
उत्पादनांमध्ये गुणवत्ता, मोठ्या प्रमाणावर उत्पादनक्षमता आणि ग्राहकांसाठी सुलभता यावर विशेष लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. “झिरो डिफेक्ट” उत्पादने ही भारताची ओळख बनली पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनात 2047 पर्यंत विकसित भारत, आत्मनिर्भरता, ऊर्जा सुरक्षा, अणुऊर्जा, उत्पादन, राष्ट्रीय सुरक्षा आणि जागतिक नेतृत्व या मुद्द्यांना विशेष महत्त्व देण्यात आले. पुढील 5 ते 7 वर्षे भारतासाठी परिवर्तनाची निर्णायक वर्षे असल्याचे सांगत त्यांनी देशवासीयांना मोठी उद्दिष्टे निश्चित करून ती वेगाने पूर्ण करण्याचे आवाहन केले.-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी