जळगाव : अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
जळगाव, २० ऑगस्ट (हिं.स.) : बोदवड-जामनेर मार्गावरील शेलवड घाटात गुटख्याची कथित अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव चारचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भोरलाल रतनसिंग दोईया (२६, रा. पिपर
जळगाव : अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू


जळगाव, २० ऑगस्ट (हिं.स.) : बोदवड-जामनेर मार्गावरील शेलवड घाटात गुटख्याची कथित अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव चारचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भोरलाल रतनसिंग दोईया (२६, रा. पिपराना मोहल्ला, नेपानगर, जि. बऱ्हाणपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर चारचाकी चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याच्याविरोधात बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोरलाल दोईया हे दुचाकीवरून बोदवडकडून आपल्या घरी परतत होते. शेलवड घाटात समोरून भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत भोरलाल यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच बोदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित चारचाकीची पाहणी केली असता वाहनामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. या साठ्याची किंमत ६ लाख ६७ हजार ७६० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

अपघातानंतर चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढल्याचे समोर आले आहे. चालक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी मृत भोरलाल यांचे भाऊ रतनसिंग दोईया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातासह वाहनातून आढळलेल्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीबाबतही पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande