रत्नागिरी : आंबा घाटात मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा
रत्नागिरी, 20 ऑगस्ट, (हिं.स.) । रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील कळकदरा परिसरात दोन मद्यधुंद तरुणांनी रस्त्यावर धिंगाणा घातला. या तरुणांनी भररस्त्यात लोळण घेत वाहतुकीस अडथळा निर्माण केला. तसेच ये-जा करणारी वाहने अडवून वाहनचालक व पर्यट
रत्नागिरी : आंबा घाटात मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा


रत्नागिरी, 20 ऑगस्ट, (हिं.स.) । रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील कळकदरा परिसरात दोन मद्यधुंद तरुणांनी रस्त्यावर धिंगाणा घातला. या तरुणांनी भररस्त्यात लोळण घेत वाहतुकीस अडथळा निर्माण केला. तसेच ये-जा करणारी वाहने अडवून वाहनचालक व पर्यटकांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत असलेल्या या दोन तरुणांनी आंबा घाटातील रस्त्यावर काही काळ हुल्लडबाजी केली. यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. वाहनांवर दगड भिरकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला.

घाटातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने या प्रकाराचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिक व प्रवाशांकडून संताप व्यक्त होत असून, संबंधित तरुणांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आंबा घाट हा रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून येथे दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अशा वर्दळीच्या मार्गावर मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाजी केल्याने अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घाट परिसरात पोलिसांची गस्त आणि निगराणी वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande