
रायगड, २० ऑगस्ट (हिं.स.) : खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी कथितपणे बेकायदेशीर जुगाराचा अड्डा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची तातडीने स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित ठिकाणी दररोज रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत कथित जुगार सुरू राहत असल्याचा आरोप आहे. या ठिकाणी दररोज अंदाजे ६० ते ७० लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. संबंधित ठिकाणाचे गुगल मॅप लोकेशनही तक्रारीसोबत सादर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीत वैभव मडवी, रफिक आणि प्रशांत या नावांच्या व्यक्तींचा कथित जुगार व्यवसायाशी संबंध असल्याची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग आहे की नाही, हे स्वतंत्र तपासातूनच स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे आरोपांची निष्पक्ष पडताळणी होणे आवश्यक आहे.
स्थानिक यंत्रणेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
मोठ्या प्रमाणावर कथित अवैध जुगार सुरू असल्याचा दावा असतानाही स्थानिक पोलीस यंत्रणेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष, संरक्षण किंवा संगनमत होत आहे का, याची वरिष्ठ स्तरावरील स्वतंत्र पथकामार्फत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदाराने रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीत स्थानिक पोलीस यंत्रणेला पूर्वकल्पना न देता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने अचानक छापा टाकावा, अशी मागणी केली आहे. तसेच कथित जुगाराचे साहित्य, रोकड, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल फोन, डिजिटल व्यवहार आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करून या प्रकरणामागील संपूर्ण नेटवर्कचा तपास करावा, असेही तक्रारीत म्हटले आहे.
तपासात स्थानिक पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा या कथित अवैध व्यवसायाला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर विभागीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणातील कारवाईचा अहवाल तक्रारदाराला ई-मेलद्वारे कळवावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)