परभणी - पाथरीत ‘टीसी’च्या अटीने निराधार लाभार्थ्यांची कोंडी
परभणी, 20 ऑगस्ट (हिं.स.)। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना, अपंग तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना शासनाकडून सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी पाथरी तहसील कार्यालयाकडे
पाथरीत ‘टीसी’च्या अटीने निराधार लाभार्थ्यांची कोंडी!


परभणी, 20 ऑगस्ट (हिं.स.)। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना, अपंग तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना शासनाकडून सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी पाथरी तहसील कार्यालयाकडे मोठ्या संख्येने प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. तहसील कार्यालयाकडे दाखल झालेल्या ५६१ प्रस्तावांपैकी केवळ ६५ प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उर्वरित प्रस्तावांच्या बाबतीत लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागत असून, विशेषतः ‘टीसी’ अर्थात शाळा सोडल्याचा दाखला यासारख्या कागदपत्रांच्या अटीमुळे वृद्ध, निराधार, दिव्यांग आणि गरजू नागरिकांची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक प्रस्ताव कागदपत्रांच्या अटी आणि त्रुटींमुळे नामंजूर होत असल्याने गरजू लाभार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

निराधार, वृद्ध, विधवा, दिव्यांग तसेच इतर गरजू नागरिकांना आधार देण्यासाठी शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजना राबविल्या जातात. पाथरी तालुक्यात या योजनांसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले जातात. मात्र, प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास अर्ज नामंजूर केला जातो. अनेक लाभार्थ्यांकडे जुने शाळा सोडल्याचे दाखले, जन्मतारखेचे पुरावे किंवा इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

-पात्र लाभार्थ्यांना दिलासा कधी?ग्रामीण भागातील वृद्ध, विधवा, दिव्यांग आणि निराधार नागरिकांसाठी शासनाच्या या योजना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अनेक लाभार्थी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने तहसील कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारणे त्यांच्यासाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे नामंजूर झालेल्या प्रस्तावांची कारणे स्पष्ट करून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची माहिती द्यावी आणि त्रुटी दूर करून प्रस्ताव पुन्हा सादर करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande