
परभणी, 20 ऑगस्ट (हिं.स.)। परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटना, सफाई कामगार संघटना आणि मुनिसिपल कामगार सेनेच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा गुरुवारी तिसरा दिवस होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक महापालिका कर्मचार्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनकर्त्या कर्मचा-यंाशी चर्चा करून त्यांच्या विविध मागण्यांची माहिती घेतली. महापालिका कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करून संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, परभणीतील व्यापारी इब्राहीम भाई यांनीही आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्या कर्मचार्यांची विचारपूस केली. आंदोलनात सहभागी कर्मचार्यांसाठी त्यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली. त्यांच्या या सहकार्याबद्दल आंदोलनकर्त्यांनी आभार व्यक्त केले. संघटनेचे अध्यक्ष नासिर खान, के. के. भारसाकळे, जालिंदर कांबळे आणि अनुसयाबाई जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन सुरू आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी एकवटले असून शासनाने या मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. आंदोलनस्थळी नजम खान, मनोज तळेकर, बाशिद खान, प्रकाश गायकवाड, मोहन वाघमारे, जलील शेख, इस्माईल बाबा, गौतम वडमारे, केशव पैके, शेख अहमद, संतोष शिंदे, नरेश साळवे, सुनील पवार, भीमा लहाने, उबाळे यांच्यासह मोठ्या संख्येने महापालिका कर्मचारी उपस्थित होते. महापालिका कर्मचार्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने संबंधित संघटनांशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis