
परभणी, २० ऑगस्ट (हिं.स.) : मतदार यादीशी संबंधित कोणत्याही कामासाठी कोणत्याही व्यक्तीस लाच अथवा अनधिकृत रक्कम देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारांना केले आहे.
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नावात दुरुस्ती करणे, मॅपिंग करणे, एसआयआर प्रक्रियेतील कार्यवाही करणे तसेच इतर कोणत्याही निवडणूकविषयक कामासाठी शासनाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. निश्चित केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून या सेवा नागरिकांना निशुल्क पुरविण्यात येतात.
त्यामुळे कोणत्याही अधिकारी, कर्मचारी अथवा अन्य व्यक्तीकडून लाचेची किंवा अनधिकृत रकमेची मागणी झाल्यास नागरिकांनी अशा मागणीस बळी पडू नये. तसेच संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
एसआयआर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने
एसआयआर प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार राबविण्यात येत आहे. पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहावे, तसेच अपात्र, विसंगत अथवा नियमबाह्य नोंदींचे नियमानुसार निराकरण व्हावे, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
निवडणूकविषयक सेवा घेताना नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अनधिकृत रक्कम देऊ नये आणि गैरप्रकार आढळल्यास तातडीने संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis