परळीत जिम ट्रेनर तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
बीड, 20 ऑगस्ट (हिं.स.)। परळी शहरातील इंदिरानगर परिसरात एका २३ वर्षीय जिम ट्रेनर तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली असून, एका तरुण जिवाने
आत्महत्या


बीड, 20 ऑगस्ट (हिं.स.)। परळी शहरातील इंदिरानगर परिसरात एका २३ वर्षीय जिम ट्रेनर तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली असून, एका तरुण जिवाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. तुलसी संजय कमळु असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

तुलसी ही परळी शहरातील एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होती आणि परिसरात ती सर्वांच्या चांगलीच परिचयाची होती. तिचे कुटुंबीय बाहेरगावी गेल्यामुळे ती घरात एकटीच होती. याच दरम्यान तिने घरात ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेत जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.

या प्रकरणी नातेवाईकांच्या माहितीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप गूढ असून, या घटनेचा अधिक तपास फौजदार चव्हाण करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande