
अकोला, 22 ऑगस्ट (हिं.स.)।
अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली-कासवी ग्रामपंचायतीच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 2 सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 3 सप्टेंबरपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली-कासवी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. गावात मूलभूत सुविधांचीही दुरवस्था झाल्याचा आरोप आहे. अनेक ठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत, परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, तर मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते, सार्वजनिक शौचालये आहेत, मात्र त्यांना दरवाजे नाहीत. नळ आहेत, पण नळाला पाणी नाही, अशी परिस्थिती सध्या गावातील आहे. १५ वा वित्त आयोग आणि सामान्य निधीतून करण्यात आलेल्या कामात प्रशासक सरपंच आणि ग्रामअधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने 2 सप्टेंबर पर्यंत चौकशी न केल्यास ग्रामपंचायत समोर ग्रामस्थ उपोषणाला बसतील असा इशारा देण्यात आला आहे..
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे