दोन वेळा जागतिक विजेता बॉक्सर झोलानी टेटेची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट (हिं.स.)दक्षिण आफ्रिकेत दोन वेळा जागतिक विजेता ठरलेल्या बॉक्सर झोलानी टेटेची त्याच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ईस्टर्न केपमधील म्दानत्सान येथे केलेल्या हल्ल्यात ३८ वर्षीय टेटेचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्
बॉक्सर झोलानी टेटे


नवी दिल्ली, 22 ऑगस्ट (हिं.स.)दक्षिण आफ्रिकेत दोन वेळा जागतिक विजेता ठरलेल्या बॉक्सर झोलानी टेटेची त्याच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ईस्टर्न केपमधील म्दानत्सान येथे केलेल्या हल्ल्यात ३८ वर्षीय टेटेचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेटे आपल्या कारमध्ये बसून घराचे गेट उघडण्याची वाट पाहत होता. त्यावेळी तोंडावर मुखवटे घातलेले दोन सशस्त्र संशयित एका वाहनातून बाहेर आले आणि त्यांनी टेटे तसेच त्याच्यासोबत असलेल्या २७ वर्षीय महिला प्रवाशावर अनेक गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात जखमी झालेली ती महिला सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

दक्षिण आफ्रिकेचे क्रीडा, कला आणि संस्कृती मंत्री गेल्टन मॅकेन्झी म्हणाले: दक्षिण आफ्रिकेने आपल्या देशातील सर्वोत्तम फायटर्सपैकी एकाला गमावले आहे. हे दोन संशयित घटनास्थळावरून पळून गेले असून या प्रकरणाचा मोठा तपास सुरू करण्यात आला आहे, असेही मॅकेन्झी यांनी सांगितले.

टेटेकडे २०१७ ते २०१९ या काळात WBO बँटमवेट किताब होता, तसेच २०१४ मध्ये त्याने IBF सुपर-फ्लायवेट किताबही जिंकला होता. युनायटेड किंगडममध्ये झालेल्या आठ लढतींपैकी एका लढतीत, २०१५ मध्ये टेटेने लिव्हरपूलच्या पॉल बटलरचा पराभव केला होता. किताब जिंकण्यासाठीच्या लढतीत सर्वात जलद 'नॉकआउट' करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही त्याच्या नावावर आहे. २०१७ मध्ये सिबोनिझो गोन्याविरुद्धची लढत त्याने अवघ्या ११ सेकंदात संपवली होती.

टेटेची शेवटची लढत जुलै २०२२ मध्ये झाली होती, ज्यात त्याने लंडनमध्ये ब्रिटनच्या जेसन कनिंगहॅमचा नॉकआउटद्वारे पराभव केला होता. मात्र, नंतर 'ड्रग्ज टेस्ट'मध्ये अपयशी ठरल्यामुळे ती लढत 'नो-कॉन्टेस्ट' म्हणून घोषित करण्यात आली. त्याच्या चाचणीत 'स्टॅनोझोलॉल' या ॲनाबॉलिक स्टिरॉइडचे अंश आढळले होते आणि 'यूके अँटी-डोपिंग एजन्सी'ने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातली होती. टेटेने आपल्या कारकिर्दीत ३४ लढतींपैकी २९ लढती जिंकल्या होत्या, तर चार लढतींत त्याला पराभव पत्करावा लागला होता आणि एक लढत 'नो-कॉन्टेस्ट' ठरली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande