
लातूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)।
अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी सहकार विभागाने आज लातूर शहरात धडक कारवाई केली. सहकार विभागाच्या पथकाने एका संशयित सावकाराच्या घर व कार्यालयावर एकाचवेळी छापा टाकून विविध कागदपत्रे, धनादेश, खरेदीखत तसेच इतर महत्त्वपूर्ण साहित्य जप्त केले.
सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, लातूर रवि गडेकर यांच्या नियुक्तीने एन. एस. शेख व ए. व्ही. कडतने यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची सविस्तर तपासणी सुरू असून, तपासाअंती संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमांतर्गत नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण तसेच प्रभारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था रमाकांत आग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
लातूर तालुक्यात अवैध अथवा बेकायदेशीर सावकारी सुरू असल्याची माहिती नागरिकांनी तातडीने सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, लातूर कार्यालय, तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, लातूर येथे द्यावी, असे आवाहन सहाय्यक निबंधक रवि गडेकर यांनी केले आहे.
अवैध सावकारी विरोधात सहकार विभागाची कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून, नागरिकांनी बेकायदेशीर सावकारीला बळी न पडता संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis