परभणी महापालिका कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; मंगळवारी प्रस्तावावर निर्णयाची शक्यता
परभणी, 22 ऑगस्ट (हिं.स.)। महापालिका कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी सुरू असलेला संप अद्यापही सुरूच असून, वाढीव जीएसटी अनुदान व इतर प्रलंबित मागण्यांसाठी परभणीसह मुंबई येथे आंदोलन करण्यात येत आहे. या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्य
परभणी महापालिका कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; मंगळवारी प्रस्तावावर निर्णयाची शक्यता


परभणी, 22 ऑगस्ट (हिं.स.)।

महापालिका कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी सुरू असलेला संप अद्यापही सुरूच असून, वाढीव जीएसटी अनुदान व इतर प्रलंबित मागण्यांसाठी परभणीसह मुंबई येथे आंदोलन करण्यात येत आहे. या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी होणाऱ्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार असून, त्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लागतील, अशी माहिती खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार जाधव यांनी शासनस्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. महापालिकेला मिळणारे वाढीव जीएसटी अनुदान, त्यातील फरकाची रक्कम तसेच कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या मागण्यांसाठी परभणीत तसेच मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या बैठकीत संबंधित प्रस्ताव ठेवण्यात येणार असून, त्यावर सकारात्मक निर्णय होऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता मंगळवारी होणाऱ्या बैठकीकडे महापालिका कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande