जळकोट शहराचा पाणी प्रश्न सुटणार
लातूर, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। जळकोट शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणि नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे. शहरासाठी माळहिप्परगा प्रकल्पातून सुमारे १० किलोमीटर लांबीची नवीन जलवाहिनी टाकणे, नवीन आधुनिक
पाणी प्रश्न सुटणार


लातूर, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। जळकोट शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणि नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे. शहरासाठी माळहिप्परगा प्रकल्पातून सुमारे १० किलोमीटर लांबीची नवीन जलवाहिनी टाकणे, नवीन आधुनिक पद्धतीची नळ योजना आणि जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी ६२ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

या अहवालाच्या ठरावास नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देऊन हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथप्पा किडे व मुख्याधिकारी रोहित आरबोळे यांनी दिली.

यापूर्वी जळकोटला माळहिप्परगा धरणातूनच तात्पुरती पाणी योजना राबवण्यात आली होती. परंतु, जुन्या जलवाहिनीमुळे आणि कमी दाबामुळे पाणीपुरवठा अपुरा पडत होता. नवीन आराखड्यानुसार माळहिप्परगा धरणावर नवीन पाण्याची टाकी बांधली जाईल. तिथून नवीन पाइपलाइनद्वारे शहरात पाणी आणले जाईल. तसेच जलशुद्धीकरण केंद्र आणि शहरात ठिकठिकाणी लहान-मोठ्या पाण्याच्या टाक्या बांधून प्रत्येक घरात पुरेसे व शुद्ध पाणी पोहोचवले जाणार आहे.

त्यामुळे आता जळकोटचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे. पाण्यासाठी होणारी धावपळ थांबणार आहे. शासनाच्या मंजुरीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. गेल्या ३-४ वर्षापासून जळकोटच्या जलयोजनेसाठी डीपीआर तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. आता हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे सादर होत आहे. त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळवून दिली जाईल. याशिवाय तालुक्यातील गावांसह उदगीर परिसरातील गावांसाठीही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे, असे माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी सांगितले.

या योजनेसाठी माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी लवकरात लवकर डीपीआर तयार करून शासनाकडे पाठवावा, त्याला तत्काळ मंजुरी मिळवून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

नवीन नळ योजना व अंतर्गत जलवाहिनी पूर्ण झाल्यावर शहरातील गल्लीबोळांमध्ये नळासाठी खोदलेले खड्डे पूर्णपणे बुजविले जातील आणि शहर पाणीटंचाईमुक्त होईल, असे नगरपंचायत प्रशासनाने सांगितले. या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला सर्व नगरसेवकांनी एकमुखाने सहकार्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande