
मुंबई, 26 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेणारा प्रजा फाउंडेशनचा मुंबई आमदार प्रगती वार्षिक अहवाल 2026 जाहीर झाला असून, मुंबईतील सत्ताधारी पक्षांच्या आमदारांची कामगिरी प्रश्न विचारण्याच्या बाबतीत पिछाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबईत एकूण 36 आमदार असले तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांना अहवालातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे 33 आमदारांचे प्रगतीपुस्तक जाहीर करण्यात आले आहे.
या अहवालात सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या तीन आमदारांमध्ये काँग्रेसचे अमीन पटेल, अस्लम शेख आणि ज्योती गायकवाड यांचा समावेश आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गटाचे सुनील प्रभू, तर पाचव्या क्रमांकावर मनोज जामसुतकर आहेत. भाजपच्या मनीषा चौधरी, योगेश सागर, अमित साटम आणि अतुल भातखळकर यांनीही पहिल्या दहा क्रमांकांत स्थान मिळवले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई दहाव्या क्रमांकावर असून आदित्य ठाकरे 18 व्या स्थानावर आहेत.
अहवालानुसार भाजपच्या तुलनेत शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची कामगिरी तुलनेने चांगली असल्याचे दिसून येते. दुसरीकडे तळातील पाच आमदारांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे, अशोक पाटील, रामचंद्र कदम, दिलीप लांडे आणि तुकाराम काटे यांचा समावेश आहे. प्रकाश सुर्वे हे सर्वांत शेवटच्या स्थानावर आहेत.
प्रजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी सांगितले की, आमदारांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न विधानसभेत पोहोचतात का, हा कामगिरी मोजताना सर्वात मूलभूत मुद्दा आहे. पंधराव्या विधानसभेतील 33 आमदारांची एकत्रित कामगिरी चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. बाराव्या विधानसभेत आमदारांचे सरासरी गुण 61 होते. ते चौदाव्या विधानसभेत 54 वर घसरले, तर पंधराव्या विधानसभेत किंचित वाढून 55 झाले आहेत. त्यामुळे ही केवळ गुणांची चढ-उताराची बाब नसून, आमदारांच्या प्रत्यक्ष कामगिरीचे मोजमाप असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule