
बीड, 26 ऑगस्ट (हिं.स.)। अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात रुग्णांची वाढती गर्दी आणि होणारी गैरसोय लक्षात घेता रुग्ण नोंदणी कक्ष आता एक तास अगोदर म्हणजेच सकाळी आठ वाजताच सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच, रुग्णालयात दोन सोनोग्राफी मशीन अविरत सुरु असून दररोज दीडशे ते दोनशे रुग्णांची तपासणी केली जात असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी दिली.
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्वाराती रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग रुग्णसंख्येच्या बाबतीत अव्वल आहे. दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. अनेक आजारांच्या निदानासाठी सोनोग्राफी अहवाल अत्यंत आवश्यक असतो. त्यामुळे क्ष-किरण विभागातील दोन मशीनद्वारे रुग्णांना सातत्याने सेवा दिली जात आहे. जोपर्यंत रांगेतील शेवटच्या रुग्णाची तपासणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत बाह्यरुग्ण विभागातील सर्व कक्ष सुरु ठेवण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी अधीक्षक डॉ. राकेश जाधव, उपअधीक्षक डॉ. नागेश अब्दागिरे, उपअधिष्ठाता डॉ. मुकुंद मोगरीकर आणि डॉ. राजेश कचरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
दुसरीकडे, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील सोनोग्राफी मशीन गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने महिला रुग्णांची अडचण होत आहे. याबाबत प्रशासनाने दखल घेतली असून, नवीन मशीन उपलब्ध करण्यासाठी शासकीय पातळीवर तसेच पॉवर ग्रीड, मानवलोक आणि बजाज उद्योग समूहाकडे सीएसआर निधीतून मागणी केली आहे. लवकरच ही मशीन मिळवून सुविधा पूर्ववत केली जाईल, असे शंकर धपाटे यांनी स्पष्ट केले. रुग्णांची वाढती गर्दी आणि त्यांना रांगेत उभ्या राहण्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी रॅगिंग प्रतिबंधक समितीचे सदस्य सुदर्शन रापतवार यांनी रुग्ण नोंदणी कक्ष लवकर सुरु करण्याची मागणी केली होती. यावर तात्काळ कार्यवाही करत प्रशासनाने हा कक्ष सकाळी साडेआठ ऐवजी आठ वाजताच सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis