
लातूर, 26 ऑगस्ट (हिं.स.)। दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत लातूर येथील राजर्षी शाहू कॉलेजने शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य केले आहे. या निर्णयाची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी दिली.
प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे म्हणाले की, गेल्या वर्षी हेल्मेट न घातल्यामुळे लातूरमध्ये जवळपास अडीचशे नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. अपघाताच्या वेळी हेल्मेट जीव वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यामुळे हेल्मेटचा वापर हा केवळ नियम म्हणून नव्हे, तर स्वतःच्या जीवाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने केला पाहिजे.
याच उद्देशाने राजर्षी शाहू कॉलेजने शिक्षक आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी दुचाकी प्रवास करताना हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमातून सुरक्षित वाहतुकीचा संदेश देण्यासोबतच समाजात जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis