सप्टेंबरमध्ये स्मार्टफोनचा ‘धमाका’; १० हजार एमएएचपर्यंत बॅटरी, दमदार प्रोसेसरसह नवे फोन बाजारात
पोको, विवो, रेडमी इनफिनिक्सच्या आणि अॅपलच्या नव्या मॉडेल्सकडे ग्राहकांचे लक्ष मुंबई, 30 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय स्मार्टफोन बाजारात सप्टेंबर महिना चांगलाच गाजणार आहे. पोको, विवो, रेडमी आणि इनफिनिक्स या आघाडीच्या कंपन्या दमदार बॅटरी, शक्तिशाली प्रोस
Smartphone Bonanza September New phones hitting market


पोको, विवो, रेडमी इनफिनिक्सच्या आणि अॅपलच्या नव्या मॉडेल्सकडे ग्राहकांचे लक्ष

मुंबई, 30 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय स्मार्टफोन बाजारात सप्टेंबर महिना चांगलाच गाजणार आहे. पोको, विवो, रेडमी आणि इनफिनिक्स या आघाडीच्या कंपन्या दमदार बॅटरी, शक्तिशाली प्रोसेसर, वेगवान चार्जिंग आणि उच्च दर्जाच्या डिस्प्लेसह नवे स्मार्टफोन बाजारात आणणार आहेत. त्यामुळे मध्यम आणि प्रीमियम-मध्यम श्रेणीतील ग्राहकांसमोर नव्या पर्यायांची मोठी रांग उभी राहणार आहे.

तर अॅपलने ही आपल्या पुढच्या लॉंच इव्हेंटची घोषणा केली आहे. 9 सप्टेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमाचे आमंत्रण चमकणाऱ्या अॅपल लोगोसह “Surprise and shine” असं शब्द घेऊन आलं आहे. हा अॅपलच्या गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठ्या आयफोन लॉंचपैकी एक असेल, अशी अपेक्षा आहे. इव्हेंट स्टीव्ह जॉब्स थिएटर, अॅपल पार्कमध्ये सकाळी 10 वाजता पॅसिफिक वेळेनुसार (भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता) होणार आहे.

पोकोच्या एफ९ प्रो आणि एफ९ अल्ट्रा या फ्लॅगशिप स्मार्टफोनचे जागतिक लाँच १ सप्टेंबरला होणार आहे. एफ९ अल्ट्रामध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट जनरेशन ५, तर एफ९ प्रोमध्ये त्याची व्ही-सीरीज आवृत्ती मिळणार आहे. पोकोच्या दाव्यानुसार एफ९ अल्ट्राने अँटुटू बेंचमार्कवर ४१ लाखांहून अधिक गुण मिळवले आहेत. दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आणि बोसकडून ट्यून केलेले स्पीकर्स मिळण्याची शक्यता आहे. २ सप्टेंबरला विवो टी५ फाइव्ह-जी भारतात दाखल होणार आहे. डायमेन्सिटी ७५०० टर्बो प्रोसेसर, १.५के ३डी कर्व्ह्ड एमोलेड डिस्प्ले, १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २,००० निट्स पीक ब्राइटनेस ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये असतील. तब्बल ७,०५० एमएएच बॅटरीमुळे दीर्घकाळ वापराची अपेक्षा आहे. अँड्रॉइड १६ आधारित ओरिजिनओएस ६ या फोनमध्ये मिळणार आहे.

तर ३ सप्टेंबरला रेडमी १७ फाइव्ह-जीचे भारतात लाँच होणार आहे. भारतीय आवृत्तीत ७,९०० एमएएच बॅटरी, स्नॅपड्रॅगन ४ जनरेशन ५ प्रोसेसर, ५० मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा आणि १२० हर्ट्झ डिस्प्ले मिळेल. ४५ वॅट चार्जिंग आणि २२.५ वॅट रिव्हर्स चार्जिंगमुळे हा फोन बॅटरी-केंद्रित ग्राहकांसाठी आकर्षक ठरू शकतो. ४ सप्टेंबरला पोको एक्स८ फाइव्ह-जी आणि एक्स८ पॉवर फाइव्ह-जी एकाच वेळी बाजारात येणार आहेत. एक्स८ पॉवरमध्ये तब्बल १०,००० एमएएच बॅटरी, १०० वॅट चार्जिंग, स्नॅपड्रॅगन ६ जनरेशन ५ प्रोसेसर आणि १.५के एमोलेड डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. याच दिवशी इनफिनिक्स हॉट ७० प्रो फाइव्ह-जीचेही लाँच होणार असून, त्यात ६,००० एमएएच बॅटरी, ४५ वॅट चार्जिंग, १४४ हर्ट्झ डिस्प्ले आणि डायमेन्सिटी ७१०० प्रोसेसर मिळणार आहे.

मोठी बॅटरी, जलद चार्जिंग आणि दमदार कामगिरी यांचा संगम साधणाऱ्या या फोनमुळे सप्टेंबरमध्ये भारतीय स्मार्टफोन बाजारातील स्पर्धा आणखी रंगतदार होणार आहे. ग्राहकांसाठी मात्र कोणता फोन खरोखर सरस ठरतो, हे त्याच्या अंतिम किंमती आणि प्रत्यक्ष कामगिरीवर अवलंबून असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande