अकोल्यात अवयवदान पंधरवडा; जनजागृतीवर भर
अकोला, 04 ऑगस्ट (हिं.स.)। राज्य शासनाच्या निर्देशानुसार ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान पंधरवडा साजरा करण्यात येत असून, अकोला जिल्ह्यात हा उपक्रम जिल्हाधिकारी वर्षा मीना, सीईओ अनय नावंदर, डॉ सुशील कुमार वाकचौरे उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला,ज
Photo


अकोला, 04 ऑगस्ट (हिं.स.)। राज्य शासनाच्या निर्देशानुसार ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान पंधरवडा साजरा करण्यात येत असून, अकोला जिल्ह्यात हा उपक्रम जिल्हाधिकारी वर्षा मीना, सीईओ अनय नावंदर, डॉ सुशील कुमार वाकचौरे उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

या पंधरवड्याचे उद्घाटन आज जिल्हा महिला रुग्णालय, अकोला येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूराव पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना एका अवयवदात्यामुळे तब्बल आठ जणांना जीवनदान मिळू शकते, असे सांगण्यात आले. मृत्यूनंतर किंवा जिवंतपणी स्वतःचे निरोगी अवयव गरजू व्यक्तीला दान करणे म्हणजे अवयवदान होय. मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुसे आणि स्वादुपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयवदान ही जगण्याची मोठी आशा ठरते. तसेच डोळे, त्वचा, हाडे आणि हृदयाच्या झडपांचे दान करून अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती स्वेच्छेने अवयवदानाची नोंदणी करू शकते. ब्रेन डेथ घोषित झालेल्या व्यक्तींचे मुख्य अवयव दान करता येतात, तर घरी मृत्यू झाल्यास डोळ्यांसारख्या ऊतींचे दान शक्य असते. अवयवदानाचा निर्णय कुटुंबीयांना पूर्वीच सांगणे आवश्यक असून, मृत्यूनंतर त्यांच्या लेखी संमतीनंतरच पुढील प्रक्रिया केली जाते.

नागरिकांनी अवयवदानासाठी अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून डोनर कार्ड प्राप्त करावे, तसेच अधिक माहितीसाठी आरोग्य विभाग, संबंधित आरोग्य संस्था, यांच्या माध्यमातून संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

जिल्ह्यात अवयवदान पंधरवड्यानिमित्त विविध आरोग्य संस्था, अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम, शपथविधी, मार्गदर्शन सत्रे आणि जनसंपर्क उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande