जीएमसीतील सीएमओंवर उद्धट वर्तनाचा आरोप; महिला सफाई कर्मचाऱ्याची अधिष्ठातांकडे लेखी तक्रार
अकोला, 04 ऑगस्ट (हिं.स.)। अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील (जीएमसी) मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. पुष्पोत्तम यांच्या विरोधात एका महिला सफाई कर्मचाऱ्याने उद्धट व अपमानास्पद वर्तन केल्याचा गंभीर आरोप करत अधिष्ठाता
जीएमसीतील सीएमओंवर उद्धट वर्तनाचा आरोप; महिला सफाई कर्मचाऱ्याची अधिष्ठातांकडे लेखी तक्रार


अकोला, 04 ऑगस्ट (हिं.स.)। अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील (जीएमसी) मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. पुष्पोत्तम यांच्या विरोधात एका महिला सफाई कर्मचाऱ्याने उद्धट व अपमानास्पद वर्तन केल्याचा गंभीर आरोप करत अधिष्ठातांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित अधिकाऱ्यावर सात दिवसांच्या आत कारवाई करण्याची मागणीही तिने केली आहे.

तक्रारदार आशा शेख बशीर, या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ४ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या मुलाला जुलाबाचा त्रास होत असल्याने उपचारासाठी अपघात विभागात नेले. त्यावेळी ओपीडी बंद असल्याने त्यांनी ड्युटीवरील सीएमओ डॉ. पुष्पोत्तम यांच्याकडे उपचाराची विनंती केली.

तक्रारीनुसार, सीएमओ यांनी त्यांना प्रथम वॉर्ड क्रमांक ४ मध्ये जाण्यास सांगितले. मात्र तेथे कोणताही डॉक्टर उपस्थित नव्हता. त्यानंतर पुन्हा सीएमओंकडे जाऊन मुलाला सलाईन किंवा इंजेक्शन देण्याची विनंती केली असता, तुझा मुलगा मरायला आला आहे का? मी सलाईन लावू शकत नाही. जिथे तक्रार करायची असेल तिथे कर, असे म्हणत अपमानास्पद भाषेत बोलल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या अधिकाऱ्याचा मोबाईल क्रमांक देत तेथे तक्रार करण्यास सांगितल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे.

तक्रारदार महिलेने आपण अनुसूचित जाती प्रवर्गातील असून आपल्या सोबत अपमानास्पद वर्तन करण्यात आल्याचा आरोप केला आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी अधिष्ठातांकडे केली आहे.

तसेच, सात दिवसांच्या आत योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तक्रार अर्जातून देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणावर रुग्णालय प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande