अकोला जीएमसीत सीएमओवर गैरवर्तनाचा आरोप
अकोला, 4 ऑगस्ट (हिं.स.) : अकोला येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका बालरुग्णाच्या आईशी कथित गैरवर्तन झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात संबंधित मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) यांनी अपमानास्पद भाषा वापरल्याचा दावा तक्रा
Photo


अकोला, 4 ऑगस्ट (हिं.स.) : अकोला येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका बालरुग्णाच्या आईशी कथित गैरवर्तन झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात संबंधित मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) यांनी अपमानास्पद भाषा वापरल्याचा दावा तक्रारदाराने केला असून, या घटनेमुळे रुग्णसेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तक्रारदार आशा शेख बशीर या शासकीय रुग्णालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या लेखी तक्रारीनुसार, 4 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 7 वाजता लूज मोशनचा त्रास होत असलेल्या मुलाला घेऊन त्या अपघात कक्षात गेल्या. त्यावेळी बाह्यरुग्ण विभाग (OPD) सुरू झाला नसल्याने त्यांनी ड्युटीवरील सीएमओ डॉ. पुरुषोत्तम यांच्याकडे मुलाची तपासणी करून घेतली. त्यांनी चौथ्या क्रमांकाच्या वॉर्डमध्ये जाण्यास सांगितले, मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

यानंतर मुलाची प्रकृती बिघडत असल्याने इंजेक्शन किंवा सलाईन लावण्याची विनंती केली असता, संबंधित अधिकाऱ्यांनी तुझा मुलगा मरणार आहे का? मी सलाईन लावू शकत नाही. तुला जेथे तक्रार करायची आहे तेथे कर, असे कथितपणे सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच डीन यांचा मोबाईल क्रमांक देत तक्रार करण्यास सांगितल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या घटनेनंतर आशा शेख बशीर यांनी अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी आपल्याशी अपमानास्पद वागणूक झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, सात दिवसांत कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे.

दरम्यान, आमदार साजिद खान पठाण यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना पत्र पाठवून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची तसेच चौकशीचा अहवाल सादर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

या प्रकरणामुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेच्या गुणवत्तेबाबत आणि आपत्कालीन विभागातील कार्यपद्धतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या प्रकरणी संबंधित मुख्य वैद्यकीय अधिकारी किंवा रुग्णालय प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. चौकशीनंतरच आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे.-------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande