
वॉशिंग्टन, 6 ऑगस्ट (हिं.स.) : अमेरिकेच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिशिगन राज्यातील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेट प्राथमिक निवडणुकीत (प्रायमरी) अब्दुल अल-सईद यांनी पक्षातील प्रस्थापित नेत्या आणि चार वेळा प्रतिनिधी राहिलेल्या हेली स्टीव्हन्स यांचा पराभव करून मोठा राजकीय विजय मिळवला आहे.
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार माईक रॉजर्स यांचा पराभव करण्यात अल-सईद यांना यश मिळाल्यास, अमेरिकेच्या 250 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम सिनेटर म्हणून त्यांची निवड होईल.
इजिप्शियन-अमेरिकन वंशाचे डॉक्टर, रोड्स स्कॉलर आणि प्रगतिशील विचारांचे नेते म्हणून ओळखले जाणारे अब्दुल अल-सईद यांच्या विजयाकडे डेमोक्रॅटिक पक्षातील बदलत्या राजकीय प्रवाहाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.
हेली स्टीव्हन्स यांना सिनेटमधील अल्पमत नेते चक शूमर, मिशिगनच्या गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर, सिनेटर गॅरी पीटर्स यांच्यासह डेमोक्रॅटिक पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा होता. तसेच इस्रायल समर्थक गटांनी त्यांच्या प्रचारासाठी कोट्यवधी डॉलर्सची आर्थिक मदत केली होती.
याउलट, तुलनेने मर्यादित आर्थिक संसाधने असलेल्या अल-सईद यांनी स्वयंसेवकांचे जाळे, लहान देणगीदारांचा पाठिंबा आणि बर्नी सँडर्स, अलेक्झांड्रिया ओकासिओ-कोर्टेझ (AOC) तसेच एलिझाबेथ वॉरेन यांसारख्या प्रगतिशील नेत्यांच्या समर्थनाच्या जोरावर विजय मिळवला.
प्रचारादरम्यान त्यांनी कॉर्पोरेट निधीमुळे अमेरिकेची राजकीय व्यवस्था भ्रष्ट होत असल्याचा आरोप केला. त्यामुळे ही निवडणूक केवळ सिनेटच्या एका जागेसाठीची लढत न राहता डेमोक्रॅटिक पक्षाच्या भविष्यातील विचारसरणीचा निर्णायक संघर्ष ठरली.
अल-सईद यांच्या प्रमुख आश्वासनांमध्ये सर्वांसाठी ‘मेडिकेअर’ आरोग्य सुविधा, श्रीमंतांवर अधिक कर, राजकारणातील कॉर्पोरेट पैशाचा प्रभाव कमी करणे आणि इस्रायलला दिली जाणारी लष्करी मदत थांबवणे यांचा समावेश आहे. त्यांनी गाझामधील युद्धाला ‘नरसंहार’ असे संबोधले आहे.
डेट्रॉईटजवळ जन्मलेल्या अल-सईद यांनी मिशिगन विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले असून ते रोड्स स्कॉलर राहिले आहेत. त्यांनी डेट्रॉईटच्या आरोग्य विभागाचे नेतृत्वही केले आहे. 2018 मध्ये त्यांनी मिशिगनच्या गव्हर्नरपदाची निवडणूक लढवली होती. त्या पराभवानंतर त्यांनी तळागाळातील जनसंपर्क आणि संघटन उभारणीवर भर दिला.
राजकीय विश्लेषकांच्या मते, अल-सईद यांच्या विजयामुळे प्रगतिशील आर्थिक धोरणे आणि प्रस्थापित व्यवस्थेविरोधातील राजकारण आता केवळ किनारी राज्यांपुरते मर्यादित राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मिशिगनसारख्या स्विंग स्टेटमध्ये मिळालेला हा निकाल डेमोक्रॅटिक पक्षाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीवर महत्त्वपूर्ण परिणाम करू शकतो.
दरम्यान, प्रस्थापित नेत्यांचे मत आहे की अशा प्रकारचे उमेदवार मध्यममार्गी मतदारांना दूर लोटू शकतात. तर प्रगतिशील गटांचा दावा आहे की अतिसावध आणि मध्यममार्गी धोरणांमुळेच डेमोक्रॅटिक पक्षाला वारंवार पराभव पत्करावा लागत आहे. त्यामुळे नोव्हेंबरमधील निवडणुकीचा निकाल केवळ मिशिगनच नव्हे, तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या भविष्यातील राजकीय दिशेसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode