
जळगाव , 15 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यातील शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागातही घरफोड्यांच्या घटनांनी डोके वर काढले आहे. रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे अज्ञात चोरट्याने बंद घराचा कडी-कोयंडा तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल ३ लाख २२ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, मागील दोन महिन्यांतील ही तिसरी घरफोडी असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
शहनाज शेख अखतर (क्य ४२, रा. खिर्डी बु.) या बाहेर गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बंद घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याच्या अंगठ्या,सोन्याचा हार, सोन्याची पोत (एकूण २५ ग्रॅम) आणि ४०० ग्रॅम चांदीचे दागिने चोरट्याने लांबवले याशिवाय, ओम साई राम बचत गटाची भरणा केलेली ५४ हजार रुपयांची रक्कम आणि इतर ३५ हजार रुपये, अशी एकूण ८९ हजार रुपयांची रोकड असा मिळून ३ लाख २२ हजार ३३० रुपयांचा ऐक्ज चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी शहनाज शेख यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल आहे. खिर्डी परिसरात मागील दोन महिन्यांत घरफोडीची ही तिसरी घटना आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर