
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर (हिं.स.)। बिहारमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी दुःख व्यक्त केले. शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांनी सरकारला मदत आणि बचाव कार्याला वेग देण्याचे आवाहन केले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून म्हटले की, बिहारमध्ये पुरामुळे झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. या आपत्तीमध्ये आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रती त्यांनी तीव्र संवेदना व्यक्त केली. या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्व लोकांसोबत आपण आहोत, असेही त्यांनी म्हटले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढे येऊन पूरग्रस्तांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. राहुल गांधी यांनी सरकार आणि प्रशासनाने पूर्ण तत्परतेने मदत व बचाव कार्य राबवावे तसेच प्रभावित कुटुंबांपर्यंत आवश्यक मदत लवकरात लवकर पोहोचवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बिहारमध्ये पुरामुळे झालेली जीवितहानी अत्यंत वेदनादायी असल्याचे म्हटले. शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांनी सांगितले की, १५ जिल्ह्यांमध्ये सुमारे ५० लाख लोक पुरामुळे प्रभावित झाले असून हजारो गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
खरगे यांनी म्हटले की, संकटाच्या या काळात सरकारचे प्राधान्य प्रत्येक प्रभावित कुटुंबापर्यंत मदत आणि सहाय्य पोहोचवणे हे असले पाहिजे. सरकार आणि प्रशासनाने मदत, बचाव, वैद्यकीय सहाय्य तसेच पुनर्वसनाच्या कामात कोणतीही कसर सोडू नये आणि प्रभावित कुटुंबांपर्यंत तातडीने मदत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस अध्यक्षांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनीही प्रभावित भागात पोहोचून नागरिकांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आवाहन केले. या कठीण काळात संपूर्ण देश बिहारसोबत उभा असल्याचे त्यांनी म्हटले.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी बिहारमधील भीषण पुरामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल दुःख व्यक्त केले. राज्यातील लाखो लोक पुरामुळे प्रभावित झाले असून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी दिवंगतांच्या आत्म्यांना शांती लाभावी, अशी प्रार्थना करत पीडित कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केली. प्रियंका गांधी यांनी सरकारला मदत आणि बचाव कार्याला वेग देण्याचे आवाहन केले, जेणेकरून प्रभावित नागरिकांपर्यंत शक्य तितक्या लवकर मदत पोहोचवता येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule