
सोलापूर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : पावसाचे असमान वितरण, ऑगस्टमधील अत्यल्प पर्जन्यमान आणि पावसाच्या दीर्घ खंडामुळे जिल्ह्यात खरीप हंगामात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या दुष्काळ परिस्थिती अहवालातून ही बाब समोर आली आहे.
जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत मोठी पर्जन्यतूट नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४८१ मिलिमीटर असताना ११ सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्षात केवळ १९७.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत ५३.५७ टक्के पर्जन्यमान झाले असून, ४६.४३ टक्के तूट राहिली आहे.
जूनमध्ये जिल्ह्यात सरासरीच्या सुमारे ८० टक्के, तर जुलैमध्येही ८० टक्के पर्जन्यमान झाले. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने मोठी ओढ दिली. या महिन्यात केवळ १०७.५० मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या ३९.९० टक्के पाऊस झाला.
पावसाचे वितरण अनियमित आणि खंडित राहिल्याने खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पिकांना आवश्यक त्या टप्प्यावर पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून, पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीच्या पाण्याची उपलब्धताही प्रभावित होत आहे.
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरदरम्यान २५ ते ४२ दिवसांचा पावसाचा मोठा खंड पडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
आगामी काळातील पर्जन्यमान, खरीप पिकांची स्थिती आणि उपलब्ध जलसाठा यावर जिल्ह्यातील कृषी व पाणीस्थिती मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत समाधानकारक पाऊस होण्याची प्रतीक्षा शेतकरी आणि प्रशासनाला आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड