
पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.)भीमाशंकर मंदिर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. मंदिर परिसराचा विकास करताना स्थानिक ग्रामस्थांचे नियोजनबद्ध पुनर्वसन, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समन्वय साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयात भीमाशंकर मंदिर व परिसराच्या विकास आराखड्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार बाबाजी काळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश इंदलकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विकास आराखड्यानुसार ग्रामस्थांना त्यांच्या विद्यमान जमिनीच्या क्षेत्रफळानुसार भूखंड देण्यात येणार आहेत. त्यासोबत १ बीएचके, २ बीएचके आणि ३ बीएचके स्वरूपातील सुसज्ज घरे बांधून देण्यात येणार आहेत. पुनर्वसित गावात ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, शाळा, बहुउद्देशीय सभागृह, समाजमंदिर, अन्नछत्र, पार्किंग, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा, पथदिवे तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मंदिर परिसरातून गावाला जोडणारा कॉरिडॉर विकसित करण्यात येणार असून, भाविकांसाठी प्रसादगृह, होल्डिंग एरिया, बसण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहांची सुविधा केली जाणार आहे. दर्शनानंतर भाविकांना पायरी मार्गाने गावात जाता येणार असल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या व्यवसायाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु