
पक्षशिस्तीचा बडगा; खुलासा सादर करण्याचे आदेश
सोलापूर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : पक्षशिस्तीला प्राधान्य देणाऱ्या भाजपने ठाणे येथे आयोजित प्रशिक्षण शिबिराला गैरहजर राहिलेल्या सोलापूर महापालिकेतील २९ नगरसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित नगरसेवकांकडून गैरहजेरीबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. महापौर विनायक कोंड्याल यांना पूर्वपरवानगी असल्याने त्यांना या कारवाईतून वगळण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोलापूर महापालिकेत भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांना महापालिकेचे सभागृह व प्रशासकीय कामकाज, प्रश्न मांडण्याची पद्धत, विकासकामे आणि सरकारी योजना मार्गी लावण्याची प्रक्रिया, नागरिकांशी संवाद तसेच पक्षाची कार्यपद्धती आणि शिस्त याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानांतर्गत निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये ६ आणि ७ सप्टेंबर रोजी हे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर पार पडले. शिबिरस्थळी ५ सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत उपस्थित राहणे नगरसेवकांसाठी बंधनकारक करण्यात आले होते. सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील चार महापालिकांमधील सुमारे २०० भाजप नगरसेवकांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण शिबिराला गैरहजर राहिलेल्या २९ नगरसेवकांना पक्षाने नोटिसा बजावल्या असून, त्यांच्याकडून प्राप्त होणारे खुलासे आणि संबंधित अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत.
----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड