
मागणी मान्य न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा
सोलापूर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना राज्य सरकारने दिलेली वाय-प्लस सुरक्षा तत्काळ काढून घ्यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी केली आहे. सुरक्षा काढली नाही, तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दोन दिवसांपूर्वी महेश डोंगरे यांनी लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिस प्रशासनाने त्यांना आंदोलन न करण्याबाबत नोटीस बजावली. या नोटिशीनंतर आता न्यायालयीन मार्ग अवलंबण्याची भूमिका डोंगरे यांनी घेतली आहे.
डोंगरे-पाटील म्हणाले की, लक्ष्मण हाके यांचे पोलिस संरक्षण काढून घ्यावे, अशी मागणी केल्यामुळे पोलिस प्रशासनाने आपल्याला आंदोलन न करण्याची नोटीस दिली आहे. मात्र, आपण केवळ लोकशाही मार्गाने ही मागणी केली होती, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, लक्ष्मण हाके यांच्यावर आरोप करताना डोंगरे-पाटील यांनी महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचे तसेच जाती-जातींत तेढ निर्माण करण्याचे काम हाके करत असल्याचा आरोप केला. त्यांच्या वक्तव्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा दावाही त्यांनी केला.
लक्ष्मण हाके यांची वाय-प्लस सुरक्षा काढण्याच्या मागणीवर राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे डोंगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड