
सोलापूर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : सौरऊर्जा प्रकल्प तसेच नदीकाठच्या विद्युत पंप व पानबुडी मोटारींमधील कॉपर वायर चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत समाधान नवनाथ पवार (वय २१, रा. रानमसले, ता. उत्तर सोलापूर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तब्बल १ लाख ८८ हजार रुपये किमतीची १४५ किलो कॉपर वायर जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कॉपर वायर चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्प, विद्युत पंप तसेच पानबुडी मोटारींमधील कॉपर वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर चोरीच्या घटनांचा छडा लावण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पथकाला दिल्या होत्या.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या पथकाने तपास सुरू केला. दरम्यान, रानमसले परिसरात समाधान पवार हा साथीदारासह सोलर प्लांटमधील कॉपर वायर चोरी करत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत समाधान पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १४५ किलो कॉपर वायर जप्त करण्यात आली. त्यानंतर केलेल्या तपासात कॉपर वायर चोरीशी संबंधित सहा गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणातील अन्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.-------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड