
२५ जागांसाठी मोठी चुरस; उमेदवारांनी एकमेकांच्या अर्जांवर घेतले आक्षेप
यवतमाळ, १६ सप्टेंबर (हिं.स.) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी सहकार भवन येथे पार पडली. बँकेच्या २५ जागांसाठी तब्बल ३८१ अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीतील मोठी चुरस स्पष्ट झाली आहे. छाननीदरम्यान उमेदवारांनी एकमेकांच्या नामनिर्देशनपत्रांवर आक्षेप घेतल्याने सहकार भवन परिसरात दिवसभर राजकीय वातावरण तापले होते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विविध राजकीय गटांच्या युती आणि आघाडीच्या समीकरणांना महत्त्व प्राप्त झाले आहे. जागावाटपावरून काही इच्छुकांमध्ये नाराजी व्यक्त होत असतानाच नामनिर्देशनपत्रांच्या छाननीदरम्यानही अंतर्गत मतभेद समोर येत असल्याचे चित्र आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आल्याने अनेक उमेदवारांच्या उमेदवारीची वैधता आता छाननीच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे उमेदवारी माघारीच्या टप्प्यापूर्वीच निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
२५ जागांसाठी ३८१ अर्ज दाखल झाल्याने इच्छुकांची संख्या मोठी असून, छाननीनंतर किती उमेदवारी अर्ज वैध ठरतात आणि माघारीनंतर अंतिम चित्र काय राहते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आक्षेप, अर्जांची वैधता आणि त्यानंतर होणाऱ्या माघारीनंतर विविध गटांकडून पॅनेलची आखणी केली जाणार आहे.
छाननीच्या पहिल्याच टप्प्यात उमेदवारांमध्ये झालेल्या आक्षेप-प्रतिआक्षेपामुळे बँकेच्या निवडणुकीची राजकीय रंगत वाढली असून, आगामी काळात समीकरणे आणखी स्पष्ट होणार आहेत.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी