
परिवहन विभागाचे आवाहन; प्रक्रिया ऑनलाइन आणि विनामूल्य
रायगड, १६ सप्टेंबर (हिं.स.) : जुन्या ड्रायव्हिंग लायसन्सवर मोबाईल क्रमांक नोंदविलेला नसलेल्या किंवा चुकीचा मोबाईल क्रमांक असलेल्या वाहनचालकांनी २५ सप्टेंबरपूर्वी आपली संपर्क माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. संपर्क क्रमांक अपडेट न केल्यास लायसन्सशी संबंधित ऑनलाइन सेवांचा लाभ घेताना अडचणी निर्माण होऊ शकतात.
परिवहन विभागाकडून ‘वाहन’ आणि ‘सारथी’ पोर्टलवरील वाहनचालकांची माहिती अद्ययावत ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढताना मोबाईल क्रमांकाची नोंद सहजपणे केली जाते. मात्र, जुन्या लायसन्समध्ये मोबाईल क्रमांकाची नोंद नसण्याची किंवा जुना क्रमांक नोंदविलेला असण्याची शक्यता आहे.
मोबाईल क्रमांक अद्ययावत नसल्यास वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर पाठविण्यात येणारे ई-चलान संदेश, लायसन्स नूतनीकरणाचे अलर्ट तसेच विविध डिजिटल सेवांसाठी आवश्यक असलेले ओटीपी संबंधित वाहनचालकांपर्यंत वेळेत पोहोचण्यात अडचणी येऊ शकतात.
घरबसल्या करता येणार प्रक्रिया
मोबाईल क्रमांक अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि विनामूल्य असून, त्यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. वाहनचालकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत ‘सारथी’ संकेतस्थळावर जाऊन राज्याची निवड करावी. त्यानंतर ‘Others’ मधील ‘Mobile Number Update’ हा पर्याय निवडून ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक आणि जन्मतारीख भरावी.
नवीन मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येते.
वाहनचालकांनी ऐनवेळी होणारा त्रास टाळण्यासाठी २५ सप्टेंबरपूर्वी मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घेण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)