महावितरण अभियंत्यांकडून शाळा, महाविद्यालयांत विद्युत सुरक्षेचे प्रबोधन
अभियंता दिनाचे औचित्य साधत 157 ठिकाणी महावितरणकडून विद्युत सुरक्षेचा जागर
विद्यार्थ्यांना हरित ऊर्जा, विद्युत सूरक्षा व वीज बचत विषयांवर प्रबोधन


कोल्हापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। ‘अभियंता दिनाचे’ औचित्य साधत महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलातील मुख्य अभियंता ते कनिष्ठ अभियंता पर्यंतच्या अनेक अभियंत्यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १५७ शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. यावेळी विद्यार्थ्यांना हरित ऊर्जा, विद्युत सूरक्षा व वीज बचत या विषयांवर मुद्देसूद व सचित्र सादरीकरण करून संवाद साधण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेची शपथही देण्यात आली.

महावितरण अभियंत्यांनी सामाजिक भान जपत यावर्षी कृतीशील ‘अभियंता दिन’ साजरा केला. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सजग नागरिक असून त्यांचे प्रबोधन समाजासाठी लाभदायक ठरणारे असते. म्हणूनच मंगळवार(दि.१५ सप्टेंबर) रोजी महावितरण अभियंत्यांकडून शाळा व महाविद्यालयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ९१ ठिकाणी तर सांगली जिल्ह्यात ६६ ठिकाणी विद्यार्थ्यांचे हरित ऊर्जा, विद्यूत सूरक्षा व वीजबचतीबाबत प्रबोधन करण्यात आले. विद्यार्थ्यांना ‘विकसित भारतात ऊर्जा क्षेत्राचे योगदान’, ‘महाराष्ट्रातील ऊर्जा परिवर्तन’ या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन अभियंत्यांकडून करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना पंतप्रधान सुर्यघर मोफत वीज योजना, स्मार्ट मीटर, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, सौरपंप, ईव्ही धोरण, गो ग्रीन आदी योजना याबाबतही विस्तृत माहिती देण्यात आली. विद्युत उपकरणांचा वापर करताना योग्य ती खबरदारी घेतल्यास वीज अपघात टाळता येतो. विद्युत सुरक्षेच्या नियमांची माहिती स्वतः घेऊन ती कुटुंबीय, मित्र आणि समाजापर्यंत पोहोचवावी. ‘सुरक्षित वीज वापर - सुरक्षित जीवन’ हा संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले.

सार्वजनिक परिसरातील सुरक्षेबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. रस्त्यावर तुटलेल्या वीजवाहिन्या किंवा तारा आढळल्यास त्यांना हात न लावता तातडीने महावितरणला कळवावे, कपडे वाळत घालण्यासाठी विद्युत खांब किंवा वीजवाहिन्यांचा वापर करू नये, पावसाळ्यात विद्युत खांब, स्टे वायर तसेच रोहित्रांपासून सुरक्षित अंतर राखावे. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडणे, रस्त्यांच्या खोदकामामुळे भूमिगत केबलमध्ये पाणी व आर्द्रता शिरणे आणि पुराच्या पाण्यामुळे रोहित्रे व विद्युत यंत्रणेला धोका निर्माण होणे, यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने वीजपुरवठा बंद करावा लागू शकतो, अशा विविध तांत्रिक बाबींची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande