
सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)।
निमा संघटना आणि हरित धारा ग्रुपच्या वतीने बीबीदारफळ येथील गाव तलाव परिसरात १२५ रोपांची ट्री-गार्डसह लागवड करण्यात आली. ‘एक रविवार गावासाठी’ या उपक्रमांतर्गत तलाव परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामालाही यावेळी प्रारंभ करण्यात आला.तलावाच्या काठावर देशी, औषधी आणि शोभीवंत झाडांची लागवड करण्यात आली. तलाव परिसर हिरवाईने नटविण्यासोबतच आगामी काळात आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचीही लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे.निमा संघटनेच्या वतीने गतवर्षी उळे, शेळगी आणि बोरामणी परिसरात वृक्षलागवड करण्यात आली होती. यंदा सुमारे ५०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्याअंतर्गत बीबीदारफळ येथे १२५ रोपांची लागवड करण्यात आली.यावेळी निमा सदस्यांनी बीबीदारफळ येथील युवकांकडून राबविण्यात येणाऱ्या विधायक उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी निमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर, सोलापूर अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी, निमा वूमन फोरमच्या अध्यक्षा डॉ. श्रुती मराठे, डॉ. साहेबराव गायकवाड, डॉ. रवी गायकवाड, डॉ. अभिजित पुजारी, डॉ. प्रवीण ननवरे, निमा संघटनेचे सदस्य, पंचायत समिती सदस्या सुनीता बारस्कर, सामाजिक कार्यकर्ते शैलेश साठे आणि ग्रामपंचायत अधिकारी सचिन शिंदे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड