
सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)।
प्रभाग क्रमांक ८ (झोन क्रमांक ७) मधील तेलंगी पाच्छा पेठ येथील इच्छाप्राप्त गणेश मंदिराजवळ नाल्यावर असलेला पूल गेल्या अनेक महिन्यांपासून पडलेल्या अवस्थेत आहे. पुलाच्या पुनर्बांधणीला अद्याप सुरुवात झालेली नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. या समस्येकडे सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.हा पूल परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पूल पडल्यापासून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पडलेल्या पुलाच्या ठिकाणी अपघाताची शक्यता असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.पुलाच्या पुनर्बांधणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नसल्याने प्रशासनाच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुलाचे अंदाजपत्रक तयार झाले आहे का? निधी मंजूर झाला आहे का? निविदा प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे? प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी मिळाली आहे का? असे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.या संदर्भात नगर अभियंता कार्यालयाकडे संबंधित कामाबाबत झालेल्या तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाहीची कागदपत्रे, अंदाजपत्रक, निधी मंजुरी, निविदेची सद्यस्थिती आणि प्रशासकीय मंजुरी याबाबतचा सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड