सोलापूर : होटगी आयटी पार्कच्या उभारणीला मिळणार गती
सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। बहुप्रतीक्षित होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आयटी पार्कच्या उभारणीला आता गती मिळण्याची शक्यता आहे. आयटी पार्कसाठी जलसंपदा विभागाची ३५ एकर जमीन हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो महाराष्ट्र राज्य
IT Park


सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। बहुप्रतीक्षित होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आयटी पार्कच्या उभारणीला आता गती मिळण्याची शक्यता आहे. आयटी पार्कसाठी जलसंपदा विभागाची ३५ एकर जमीन हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाकडून या प्रस्तावावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. जमीन वर्गीकरण व हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयटी पार्कच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्य शासनाने होटगी येथे आयटी पार्कला मंजुरी दिली आहे. या ठिकाणी आयटी पार्कसाठी आवश्यक इमारतीची उभारणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून केली जाणार आहे.होटगी येथे जलसंपदा विभागाच्या मालकीची एकूण ५० एकर जमीन आहे. या जागेची मोजणी करण्याची प्रक्रिया ८ ऑगस्ट रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर आयटी पार्कसाठी आवश्यक असलेल्या ३५ एकर जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयटी पार्कच्या उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने सोलापूरच्या आयटी क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande