
पुणे, 18 सप्टेंबर (हिं.स.)। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने सहा विभागांसाठी जारी केलेल्या सुधारित आकृतीबंधामुळे बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदे कमी झाली आहेत. यामध्ये सहा प्राध्यापक, १२ सहयोगी प्राध्यापक आणि १३ सहाय्यक प्राध्यापक पदांचा समावेश आहे. पदकपातीमुळे अध्यापन, रुग्णसेवा आणि प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने केला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ संघटनेने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलन केले.
शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, जीवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र आणि जन औषध वैद्यकशास्त्रया सहा विभागांसाठी सुधारित आकृतीबंध जारी करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील विविध संवर्गांतील एकूण १५८ अध्यापक पदे कमी झाली आहेत. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयात सध्या उपलब्ध असलेला अध्यापक वर्गच अपुरा असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. अध्यापनासोबतच अध्यापकांकडून रुग्णसेवा आणि अतिरिक्त प्रशासकीय जबाबदाऱ्याही पार पाडल्या जातात. त्यामुळे अध्यापक पदे कमी केल्यास पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षणासह रुग्णसेवेवर थेट परिणाम होण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे. भारतीय आयुर्विज्ञान आयोगाच्या किमान मानकांचा आधार घेऊन सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आला असला, तरी प्रत्यक्ष संस्थेतील कामाचा ताण, रुग्णसंख्या, अध्यापन आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा पुरेसा विचार करण्यात आलेला नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.महाराष्ट्र गव्हमेंट नर्सेस असोसिएशन तसेच निवासी डॉक्टर संघटनेनेही या मागणीला पाठिंबा दिला आहे. सुधारित आकृतीबंध तातडीने रद्द करावा आणि भविष्यात आकृतीबंध तयार करताना संबंधित संस्थेतील रुग्णसेवा, अध्यापन व प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु