गणेशोत्सवाचा वारसा ‘बाप्पा डॉट ओआरजी’वर डिजिटल स्वरूपात जतन करा : सोलापूर जिल्हाधिकारी
सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायती, सामाजिक-सांस्कृतिक संस्था आणि नागरिकांनी गणेशोत्सवाच्या डिजिटल लोकचळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यां
Collctor


सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायती, सामाजिक-सांस्कृतिक संस्था आणि नागरिकांनी गणेशोत्सवाच्या डिजिटल लोकचळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने गणेशोत्सवातील परंपरा, कला, विधी आणि आठवणींचे डिजिटल दस्तऐवजीकरण करून त्या जागतिक पटलावर पोहोचविण्यासाठी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ (bappa.org) हा उपक्रम सुरू केला आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.पुरातत्त्व संचालनालयाने विकसित केलेल्या या डिजिटल व्यासपीठावर नागरिकांना घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाशी संबंधित छायाचित्रे, व्हिडिओ, पाककृती, आरत्या, परंपरा आणि वैशिष्ट्यपूर्ण कथा अपलोड करता येणार आहेत.सोलापूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, स्थानिक सजावट, खाद्यसंस्कृती, मूर्तिकला आणि लोककलांचे दस्तऐवजीकरण या माध्यमातून करता येणार आहे. त्यामुळे सोलापूरची सांस्कृतिक ओळख देश-विदेशात पोहोचण्यास मदत होईल. तसेच स्थानिक कलावंतांना व्यापक ओळख मिळण्याबरोबरच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनालाही चालना मिळू शकते, असे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले.या अभियानात माहिती नोंदविणाऱ्या नागरिकांना शासनातर्फे ‘डिजिटल कल्चरल प्रिझर्वर प्रमाणपत्र’ देऊन गौरविण्यात येणार आहे. नागरिकांनी संकेतस्थळावर जाऊन ‘तुमची कथा सांगा’ या पर्यायाद्वारे आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित कथा, पाककृती, परंपरा किंवा आरतीची माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande