
पुणे, 18 सप्टेंबर (हिं.स.)। पुणे रेल्वे विभागातील हडपसर-घोरपडी दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कार्यान्वयनासाठी अभियांत्रिकी, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांशी संबंधित कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी १५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून, १९ सप्टेंबर २०२६ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्री-नॉन इंटरलॉकिंग (Pre-NI) आणि नॉन-इंटरलॉकिंग (NI) कामे केली जाणार आहेत.
या कामांचा सोलापूर विभागातून धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, काही गाड्या या कालावधीत पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलून त्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.ट्रॅफिक ब्लॉकच्या कालावधीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गाड्यांच्या वेळापत्रकाची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ‘NTES’ ॲपवरून संबंधित गाडीच्या वेळेची आणि मार्गाची माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु